नवी दिल्ली – दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष लोकसभा निवडणुकीकरता एकत्र येणार अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत युती करण्यास नकार दिला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज, सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील युतीबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
दिल्ली येथील विमानतळावर बोलताना केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. केजरीवाल म्हणाले की, आपण राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. मात्र त्यांनी ‘आप’शी युती करण्यास नकार दिला आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
आप- काँग्रेसच्या युतीसाठी केजरीवाल यांनी आपल्याशी कधीही संपर्क साधला नाही, असा दावा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष शीला दीक्षित यांनी केला होता. त्यावर बोलताना केजरीवाल म्हणाले की, आम्ही राहुल गांधीची भेट घेतली. दीक्षित या काही महत्वाच्या नेत्या नाहीत.
यापूर्वी देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘आप’कडे मैत्रिचा हात पुढे केला होता. पण, काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी मात्र त्याला नकार दिला होता.