शिक्रापूर -नागरिकांना कोठेही अडचणीत मदत हवी असल्यास शासनाच्या वतीने नव्याने 112 हा क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर वारंवार फोन करून पोलिसांना त्रास देण्याच्या हेतूने खोटी माहिती देऊन त्रास देणाऱ्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंकुश मारुती केदारी (वय 40 रा. शिरसगाव काटा ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार योगेश आनंदा गुंड (रा. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. शिरसगाव काटा येथील अंकुश हा मोबाइलवरून पोलीस हेल्पलाइन नंबर 112 वर वारंवार फोन खोटी माहिती देत मदत मागत होता. शिरूरचे सहायक उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप, पोलीस अंमलदार योगेश गुंड, गणेश आगलावे आदींनी या ठिकाणी त्याला मदत देण्यासाठी गेले असता तो मोबाइल बंद करून ठेवत असे,
त्याला वारंवार संपर्क केला तरी देखील तो उत्तरे देत नसत त्यांनतर पोलिसांनी गावामध्ये चौकशी केली असता अंकुश दारुच्या नशेत मुद्दाम पोलिसांना त्रास देण्याचे हेतूने पोलीस ठाणे तसेच पोलीस कंट्रोल रूम येथे फोन करून खोटी माहिती देऊन पोलिसांना त्रास देण्याचे कृत्य करत असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक राजेंद्र साबळे करीत आहे.