पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूमध्ये माजी आयएएस अधिकारी मनिषकुमार वर्मा यांनी प्रवेश केला. त्यामुळे नितीश यांनी जेडीयूमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभारण्याची प्रक्रिया सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.जेडीयूने अलिकडेच 56 वर्षीय संजयकुमार झा यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यापाठोपाठ 50 वर्षीय वर्मा यांना त्या पक्षात प्रवेश देण्यात आला. ते नितीश यांचे निकटवर्तीय मानले जातात. वर्मा यांनी 3 वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आता जेडीयू प्रवेशामुळे ते राजकारणात सक्रिय होणार आहेत. झा यांची नियुक्ती आणि वर्मा यांचा पक्षप्रवेश याबाबी नितीश यांच्या पुढील रणनीतीवर प्रकाश टाकणाऱ्या ठरल्या आहेत. नियुक्तीनंतर झा यांनी बिहारबाहेर विस्तारण्याचा जेडीयूचा इरादा बोलून दाखवला. त्या योजनेला पूरक स्वरूपाची घडामोड म्हणून वर्मा यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिले जात आहे. त्यांनी बराच काळ ओडिशामध्ये सेवा केली. नितीश यांच्या पक्षात दुसऱ्या फळीतील नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळेही झा आणि वर्मा यांच्याशी संबंधित घडामोडींना मोठे महत्व आहे. ते दोघेही नितीश यांचे निष्ठावान सहकारी मानले जातात. त्यांच्याकडे आगामी काळात नितीश बरीचशी जबाबदारी सोपवतील असे संकेत मिळत आहेत.