IND vs AUS : नितीश कुमार रेड्डीने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियामध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 474 धावांचं सडेतोड उत्तर दिलं आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया सहज हा सामना जिंकेल असे वाटले होते. मात्र भारताच्या युवा फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले. आठव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.
रविंद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला आणि सामना हातून गेल्यातच जमा आहे असं वाटत होतं. पण नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने कमाल केली. दोघांनी सर्वात आधीच टीम इंडियावरील फॉलोऑनचं संकट टाळलं.
त्यानंतर एक एक धाव घेत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 358 धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी नाबाद 105, तर मोहम्मद सिराज नाबाद 2 धावांवर खेळत आहे.
नितीश कुमार रेड्डीने रचला इतिहास
नितीश कुमार रेड्डीने या मालिकेत इतिहास रचला आहे. नितीश हा या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.तसेच ऑस्ट्रेलियात एका प्रतिस्पर्धी खेळाडूने षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत 8 षटकार मारणारा रेड्डी पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आता एक षटकार मारल्यानंतर रेड्डी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम करेल.
या संपूर्ण बॉर्डर गावस्कर मालिकेत नितीश कुमार रेड्डीने आपल्या फलंदाजीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. रेड्डी यांनी 41, 38*, 42, 42, 16 आणि आता 105 नाबाद धावा खेळल्या आहेत. या संपूर्ण मालिकेत नितीश कुमार रेड्डीने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.





