Nitish Kumar : अखेर बिहारमधला सस्पेन्स संपला असून उद्या गांधी मैदानावर नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थिती लावणार आहेत. त्यापूर्वी, आज एनडीएची महत्वाची बैठक पार पडली. यात नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. एनडीए आमदारांची बिहार विधानसभेच्या इमारतीत आज बैठक झाली. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर देखील करण्यात आला. या बैठकीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि बिहार भाजपा निरीक्षक केशव प्रसाद मौर्य, सह-निरीक्षक खासदार साध्वी निरंजन ज्योती, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल, ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान आणि विनोद तावडे उपस्थित होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राजीनामा देत नवीन सरकार स्थापनेचा दावा केला. ते उद्या, गुरुवारी सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंहा हे उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाची व्यापक तयारी देखील सुरू आहे. एनडीएचे अनेक वरिष्ठ नेते देखील या समारंभात सहभागी होणार आहेत.