पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी एकप्रकारे एनडीएमध्येच राहणार असल्याची ग्वाही दिली. भाजप जुना मित्र असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. नितीश अस्वस्थ असून एनडीएमधून बाहेर पडू शकतात, असा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले आहे. अशात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे संबंधित चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले. त्या विषयाशी संबंधित प्रश्न पत्रकारांनी नितीश यांना विचारले. त्यावर ते उत्तरले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मला नेहमीच पाठिंबा लाभला. त्यांनी मला केंद्रीय मंत्री बनवले. मी मुख्यमंत्री बनावे अशी त्यांचीच इच्छा होती. त्यामुळे मी भाजपसमवेत का राहू नये? राजद-कॉंग्रेसशी हातमिळवणीचा आग्रह धरण्याची चूक माझ्या पक्षातील (जेडीयू) नेत्यांनी दोनवेळा केली. मी ती चूक दोन्हीवेळा दुरूस्त केली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. नितीश यांनी त्यांच्या वक्तव्यातून एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता फेटाळल्याचे सूचित होत आहे.