प्रभात वृत्तसेवा वाठार स्टेशन – प्रभात वृत्तसेवास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थिती आणि कार्यकर्त्यांचा कल पाहून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास युती करू, असे मत खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे उद्योजक राजेंद्र भोसले (काका) यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय. कोरेगाव तालुका नेहमीच यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि अजित पवार यांच्या विचाराने चालत आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे तळागाळापर्यंत पोचली आहेत. पक्षाचे विभाजन झाल्यानंतरही इथली जनता राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारी आहे. येथे (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे समविचारी पक्ष आहेत किंवा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा कल असेल त्या पद्धतीने सगळ्यांशी चर्चा करून जास्तीतजास्त जागांवर आमचे उमेदवार जाहीर करू.वाठार स्टेशन गट ओबीसी महिलेसाठी राखीव असून, येथे कुणबी राजकीय अतिक्रमण सहन करणार नसल्याची भूमिका काही जणांनी घेतली आहे. याबाबत खासदार पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. या निवडणुकीत चांगले यश मिळवण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना आहे. त्यामुळे उमेदवार किती सक्षम आहे हे पाहावे लागेल. ओबीसी उमेदवार सक्षम असेल, तर त्याला उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रामराजेंबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा.. रामराजे नाईक निंबाळकर हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती. नगरपालिका निवडणुका संपल्यावर त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा मुंबईतील बैठकीत झाली होती. मात्र, नगरपालिकेला आम्हाला घड्याळ चिन्ह द्यावे, असा रामराजेंचा आग्रह होता; परंतु विधानसभेला जे कार्यकर्ते आमच्यासोबत होते, त्यांची घड्याळ चिन्हाची मागणी होती. वैचारिक मतभेदामुळे पालिका निवडणूक झाल्यावर निर्णय घेऊ, असे ठरले होते; परंतु त्यांच्या फलटणमधील राजे गटाने धनुष्य बाणाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले, असेही खासदार नितीन पाटील यांनी सांगितले