नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने (भाजप) बिहार सरकारमधील मंत्री आणि ज्येष्ठ नेते नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदीनियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या संसदीय मंडळाने मंजूर केली असून, १४ डिसेंबर २०२५ पासून ती तात्काळ लागू झाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होती. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना विस्तार देण्यात आला होता. आता पक्षाने संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचा निर्णय घेत नितीन नबीन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. नितीन नबीन हे बिहार विधानसभेतील बांकीपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सलग पाच वेळा निवडून आलेले नेते असून, बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. विद्यार्थी राजकारणापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत भाजपमध्ये विविध संघटनात्मक पदांवर काम केले आहे. पक्षातील दीर्घ अनुभव, प्रशासकीय कुशाग्रता आणि संघटनात्मक बांधणीच्या क्षमतेमुळे त्यांची ही निवड झाली आहे. भाजपच्या संघटनेत ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक मजबुतीकरणात नितीन नबीन यांची भूमिका निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा आहे.