मुंबई : वाढवण बंदरामुळे बंदर क्षेत्रात भारताचे जगातील स्थान भक्कम होणार आहे. या एका प्रकल्पामुळे तब्बल १ लाख थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत. शिवाय २० ते २५ हजार अप्रत्यक्ष रोजगारही मिळतील. त्यामुळे हे बंदर गेमचेंजर ठरणार आहे, असा विश्वास मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. राणे म्हणाले की, जगात बंदर क्षेत्रात भारताची असलेली स्थिती समजवून घेणे हे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी समुद्राची खोली जास्त अशा ठिकाणी बंदरे उभारली जातात. सर्वात खोल बंदर हे गुजरातमधील मुंद्रा बंदर आहे. तेवढे खोल बंदर देशात दुसरीकडे कुठे नाही. मात्र होवू घातलेले वाढवण बंदर हे जास्त खोली असलेले बंदर ठरणार आहे. ते भारतातले सर्वात मोठे बंदर ठरणार आहे, असे यावेळी राणे यांनी सांगितले. जगात पहिल्या २० बंदरांचा विचार केला तर पहिल्या १० मध्ये चीनच्याच बंदरांचा समावेश आहे. पण ज्या वेळी वाढवण बंदर तयार होईल त्यावेळी ते जगातल्या पहिल्या पाच बंदरात येणार आहे. आपण त्यावेळी महासत्ता असणाऱ्या देशांच्या स्पर्धेत येणार आहोत. शिवाय बंदरांच्या स्पर्धेत आपण प्रगत देशांच्या पंगतीत बसलेलो असू असेही त्यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यातही याच वाढवण बंदराचा मोठा वाटा असणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिकांना प्राधान्य दरम्यान इथल्या स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय स्थानिकांना नोकरीत इथे प्रथम प्राधान्य दिले जाणार असून त्यासाठी स्किल डेव्हलपमेंटमधून प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या बंदराचा पहिला टप्पा लवकरच सुरू होईल यासाठी प्रयत्न असल्याचे देखील ते म्हणाले.