सिंधुदुर्ग : तळकोकणातील सावंतवाडी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठे खिंडार (Nitesh Rane) पडले आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्याविरोधात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लढलेले शिवसेनेचे माजी नेते राजन तेली यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत दसरा मेळाव्यात शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची ताकद वाढल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे, वैभववाडी तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नंदू शिंदे नवे तालुकाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभववाडी तालुक्याचे माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांची पक्षविरोधी कारवायांमुळे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी नंदू शिंदे यांची तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मात्र, लोके यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह शनिवारी (4 ऑक्टोबर 2025) भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोके यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता, त्यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाची ताकद वाढली सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने शिवसेना (शिंदे गट) मजबूत स्थितीत आला आहे. खासदार नारायण राणे यांचे कट्टरविरोधक म्हणून ओळखले जाणारे तेली यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे सावंतवाडीत शिंदे गटाची पकड आणखी घट्ट झाल्याचे बोलले जात आहे. नितेश राणेंचा डाव दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी योग्य वेळी डाव साधत मंगेश लोके यांच्या भाजप प्रवेशाकडे लक्ष वेधले आहे. लोके यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोके यांचा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या पक्षप्रवेशांमुळे महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची अवस्था नाजूक? राजन तेली यांचा शिंदे गटात आणि मंगेश लोके यांचा संभाव्य भाजप प्रवेश यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद कमकुवत होत असल्याची चर्चा आहे. स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर हे धक्के ठाकरे गटासाठी मोठा अडथळा ठरू शकतात. यामुळे तळकोकणात ठाकरे गटाला औषधालाही जागा शिल्लक राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.