Nitesh Rane : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. (Nitesh Rane) मे २०२३ मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी राऊत यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी राणे यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. (Nitesh Rane) या प्रकरणात यापूर्वी राणे यांनी सुनावणी दुसऱ्या न्यायालयात हलवण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर झालेल्या दोन सुनावण्यांना ते गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने आता जामीनपात्र वॉरंट काढण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून जामीन मिळवणे बंधनकारक ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. (Nitesh Rane)