‘या’ प्रसिद्ध कंपनीच्या फोर व्हिलरमध्ये ब्रेक सिस्टम त्रुटी; 1552 गाड्या परत मागवल्या

Nissan Magnite : भारतात निर्मित २०२५ निसान मॅग्नाइट गाड्यांना तांत्रिक समस्यांमुळे परत मागवण्याचा निर्णय निसान कंपनीने घेतला आहे. ब्रेकिंग सिस्टममधील संभाव्य त्रुटीमुळे तब्बल १,५०० हून अधिक गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला निसानने आपल्या मॅग्नाइटचे नवीन मॉडेल लाँच केले होते.
यावेळी कंपनीने राइट-हँड-ड्राइव्ह (RHD) आणि लेफ्ट-हँड-ड्राइव्ह (LHD) अशी दोन्ही माॅडेल एकाच वेळी सादर केले होते. भारतात निर्मित मॅग्नाइटच्या LHD गाड्यांसाठी सौदी अरब हे पहिले बाजारपेठ होते. मात्र, आता सौदी अरबला पाठवलेल्या या मेड-इन-इंडिया २०२५ निसान मॅग्नाइट गाड्यांना कंपनीने परत मागवले आहे. तब्बल १,५५२ गाड्या रिकॉल करण्यात आल्या आहेत. पण, नेमके काय घडले आहे? कंपनीला निर्यात केलेल्या गाड्या का परत मागवाव्या लागल्या? जाणून घेऊया…
गाड्या का परत मागवल्या?
कंपनीने गाड्या परत मागवण्याचे कारण ब्रेकिंग सिस्टममधील संभाव्य त्रुटी असल्याचे सांगितले आहे. निसानने म्हटले आहे की, या त्रुटीमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो, त्यामुळे ही त्रुटी तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. सौदी अरबमध्ये निसानने १,५५२ मॅग्नाइट SUV गाड्यांची तपासणी करण्यासाठी स्वेच्छेने रिकॉल जाहीर केला आहे. हा रिकॉल ९ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला असून त्याचा संदर्भ क्रमांक २५१०० आहे. हा रिकॉल २०२५ मॅग्नाइट SUVच्या ब्रेकिंग सिस्टमशी संबंधित आहे आणि कंपनी ही दुरुस्ती विनामूल्य करणार आहे.
गाड्यांमध्ये नेमकी काय समस्या आहे?
निसानच्या मते, ब्रेक पाइप आणि हीट शील्ड यांच्यामधील जागा कमी असू शकते. यामुळे ब्रेक पाइप आणि हीट शील्ड यांच्यात घर्षण होऊन ब्रेक पाइपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी, ब्रेक फ्लुइड गळती होऊ शकते, ज्यामुळे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर ब्रेकची चेतावणी दिसू शकते किंवा ब्रेक नीट काम करणार नाहीत. ज्या ग्राहकांनी या गाड्या खरेदी केल्या आहेत, त्यांना नजीकच्या निसान सर्व्हिस सेंटरशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय मॉडेलवर याचा परिणाम होईल का?
भारत आणि सौदी अरबमध्ये विकल्या जाणाऱ्या निसान मॅग्नाइट गाड्या जवळपास समान आहेत, फक्त LHD आणि RHD मधील फरक आहे. सौदी अरबच्या मॉडेलमध्ये आढळलेली त्रुटी भारतीय मॉडेलमध्ये कदाचित नसेल, कारण ड्रायव्हरच्या बाजूच्या फरकामुळे ब्रेक फ्लुइड पाइप वेगळ्या पद्धतीने बसवले जातात. निसानने भारतात विकल्या जाणाऱ्या मॉडेल्ससाठी अद्याप असा कोणताही रिकॉल जाहीर केलेला नाही.
कंपनीच्या पुढील योजना –
निसान मॅग्नाइटला आणखी LHD आणि RHD बाजारपेठांमध्ये नेण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, कंपनी भारतात रेनॉल्ट ट्रायबरसारखी सब-४ मीटर MPV आणि रेनॉल्ट डस्टरसारखी कॉम्पॅक्ट SUV लाँच करण्याच्या योजनेवर काम करत आहे.





