Nisha Parulekar: अभिनयातून राजकारणात प्रवेश; अभिनेत्री निशा पारुळेकर यांचा बीएमसी निवडणुकीत दणदणीत विजय

Nisha Parulekar: मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक २०२६ चे निकाल जाहीर झाले असून भाजपाला यामध्ये मोठे यश मिळाले आहे. याच निवडणुकीत मराठी अभिनेत्री निशा पारुळेकर यांनीही शानदार विजय मिळवत राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे.
निशा पारुळेकर यांनी भाजपाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात त्यांना अंतर्गत बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान होते. मात्र त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करत स्पष्ट विजय मिळवला.
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर निशा पारुळेकर यांनी भाजपाच्या संघटनात्मक कामातही सहभाग घेतला होता. त्यांच्या लोकप्रियतेची दखल घेत पक्षाने त्यांची भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती केली होती. या भूमिकेत त्यांनी कलाकारांच्या समस्या मांडण्याचे काम केले, ज्यामुळे पक्षात त्यांचे महत्त्व वाढले.
अभिनय क्षेत्रात निशा पारुळेकर यांची ओळख आधीपासूनच आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. ‘सही रे सही’ या लोकप्रिय नाटकातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘महानायक’ आणि ‘शिमना’ यांसारख्या मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.
टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी लक्षवेधी काम केले आहे. ‘दक्खंचा राजा ज्योतिबा’ या मराठी मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाई यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या.
आता अभिनयाच्या दुनियेतून बाहेर पडत निशा पारुळेकर यांनी राजकारणात यशस्वी वाटचाल सुरू केली असून, बीएमसी निवडणुकीतील विजयामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे लक्ष लागले आहे.





