Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने हा पूर्ण अर्थसंकल्प नसून अंतरिम अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सहाव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या पाच वर्षात अर्थमंत्री असताना निर्मला सीतारामन यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यावर्षी त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम होणार आहे.
मोरारजी देसाई यांच्या नावे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केल्याचा विक्रम
देशात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी संसदेत 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात आठ पूर्ण अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे. अर्थमंत्री असताना, मोरारजी देसाई यांनी 1959 ते 1964 पर्यंत पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आता निर्मला सीतारामनही या प्रकरणात त्यांची बरोबरी करणार आहेत. निर्मला सीतारामन या 2019 ते 2024 या कालावधीत अर्थमंत्री म्हणून आपला सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्या यंदा सहाव्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांसारख्या माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्ड मोडतील. या नेत्यांनी अर्थमंत्री असताना सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते. आर. के. शनमुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. २०१६ पासून अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला अर्थसंकल्प सादर करणे सुरू केले.
निर्मला सीतारमण यांच्या नावे आहेत हे विक्रम
निर्मला सीतारमण मन यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम केला आहे. 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 42 मिनिटांचे भाषण केले. त्यावेळी त्यांनी जुलै 2019 मध्ये केलेल्या 2 तास 17 मिनिटांच्या भाषणाचा स्वतःचा विक्रम मोडला होता.
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे बजेटची कागदपत्रे ठेवण्यासाठी चामड्याच्या ब्रीफकेस किंवा पिशव्या वापरल्या जात होत्या. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा विक्रम मोडला. कोविड-19 महामारीच्या आगमनानंतर 2021-22 चा अर्थसंकल्प पेपरलेस सादर करण्यात आला. पेपरलेस बजेट सादर करण्याचा विक्रमही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे.
2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून तिने 5 पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. अशाप्रकारे निर्मला सीतारमण या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. याशिवाय निर्मला सीतारामन यांच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. त्यांच्या आधी इंदिरा गांधी यांनी 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता.