SBI आणि LIC ची अदानी समूहातील गुंतवणूक मर्यादित – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – गौतम अदानी यांच्या शेअरची घसरण आणि त्याचा शेअर बाजार, एसबीआय आणि एलआयसीवर झालेला परिणाम यावरही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सीतारामन म्हणाल्या, “एसबीआय आणि एलआयसी या दोन्ही संस्थांच्या सीएमडींनी यावर तपशीलवार विधाने केली आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, अदानी समूहात त्यांची गुंतवणूक मर्यादित आहे, ठरवलेल्या मर्यादेत आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून त्यांनी आतापर्यंत नफा कमावला आहे. बाजार नियंत्रक चांगले काम करत आहेत. भारतीय शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. भारतीय बाजारावर विदेशी गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत सीतारामन म्हणाल्या की, गुंतवणूकदारांच्या वर्तनात बदल होणे सामान्य गोष्ट आहे. तसेच त्यांनी भारतीय बँकिंग क्षेत्राची स्थिती भक्कम असल्याचे सांगितले. बँकांचा एनपीए कमी होत असून आज भारतीय बँका झपाट्याने वाढत असल्याचेही सांगितले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या प्रश्नावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. सध्या भारतीय बँकिंग क्षेत्र आरामदायक स्थितीत आहे. त्यांना बाजारातून चांगले पैसे मिळत आहेत. आमची खासगीकरणाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. मात्र यावेळी सरकारला कोणत्या बँकेचे खाजगीकरण करायचे आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.





