नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-32), पवन गुप्ता (वय-25), विनय शर्मा (वय-26) आणि अक्षय कुमार सिंग (वय-31) अशी या आरोपींची नावं आहेत.
देशभरात खळबळ उडवून देणऱ्या निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज सकाळी पाच वाजता फाशी देण्यात आली. काल, निर्भयावर बलात्कार झाला त्यावेळी आपण दिल्लीतच नव्हतोच, असा दावा करणारी या प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला होता. याबाबत सुनावणी करताना काल, दोषींनी न्याय मिळवण्याच्या सर्व सोपस्कार पार पाडले आहेत. त्यामुळे आता या याचिकेला किंमत देता येणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते.
अशी दिली फाशी…
या फाशीसाठी मिरतहून पवन जल्लाद तिहार कारागृहात मंगळवारी सायंकाळी आले. त्यांनी फाशीची सर्व तयारी पूर्ण केली. जेलच्या नियमावलीनुसार कारागृह अधिक्षकांनी स्वत: जातीने दोरखंडाची चाचणी आणि फाशी स्थळाची तपासणी केली. त्यानंतर आरोपींच्या वजनाच्या पाच पट वजनाचे वाळूचे पोते बांधून दोरखंडाची मजबुती तपासली.
फाशी देताना अधिक्षक, उप अधिक्षक प्रमुख वैद्यकीय अधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य असते. किमान 10 पेक्षा हवालदार, वॉर्डन, आणि दोन हेड कॉन्स्टेबल, हेड वॉर्डन, आणि तेवढ्याच संख्येने कारागृहाचे सशस्त्र जवान तेथे तैनात करावेत, असे त्यात नमूद केले होते.