मुंबई : फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या जामिनासाठीचा अर्ज ब्रिटनमधील कोर्टाने गुरुवारी सलग पाचव्या वेळी फेटाळला. पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) मध्ये सुमारे 2 अब्ज डॉलरची फसवणूक आणि मनीलॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपांवरून भारताकडे प्रत्यार्पणासाठी मोदीविरोधात खटला सुरू आहे.
नीरव मोदीला गेल्या वर्षी मार्च महिन्यात अटक केल्यापासून दक्षिण-पश्चिम लंडनमधील वॅन्ड्सवर्थ कारागृहात ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या प्रत्यर्पणाचा खटला मे महिन्यात नियोजित आहे.
मात्र दरम्यानच्या परिस्थितीत झालेल्या बदलांच्या आधारे जामीन मिळविण्यासाठी त्याने पाचव्यांदा प्रयत्न केला. मात्र लंडनमधील उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
त्याच्यावरील आरोपांचे गांभीर्य पाहता त्याला जामीन मिळणे मुश्कील मानले जात होते. त्यानुसार न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला.
भारत सरकारच्या आरोपावरून स्कॉटलंड यार्डने प्रत्यार्पणाच्या वॉरंटवरून 19 मार्च 2019 रोजी मोदीला अटक केली होती.