नीरव मोदी, चोक्सीची 1,350 कोटींची मालमत्ता मायदेशी परत

नवी दिल्ली – नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्या मालकीची तब्बल 1,350 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने हॉंगकॉंगमधून भारतात परत आणली. यामध्ये 2,300 किलो वजनाचे पॉलिश केलेले हिरे, मौल्यवान खडे आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज मुंबईत आलेल्या 108 वस्तूंपैकी 32 वस्तू नीरव मोदीचे नियंत्रण असलेल्या विदेशातील कंपनीच्या मालकीच्या आहेत. तर उर्वरित वस्तू मेहुल चोक्सीची मालकी असलेल्या कंपनीचा आहेत.
पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुंबईतील शाखेत 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिकच्या बॅंक घोटाळ्याप्रकरणी मनी लॉंडरिंग विरोधी कायद्यांतर्गत ईडीकडून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरोधात तपास केला जात आहे.
हॉंगकॉंगमधील अधिकाऱ्यांकडून ही मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया “ईडी’ने पूर्ण केली असून ही सर्व मालमत्ता “पीएमएलए’ कायद्याखाली ताब्यात घेतली जाईल, असेही “ईडी’ने म्हटले आहे.





