नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत
पिंपरी – इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हे ९० वर्षीय आजीने दाखवून दिले. करोनावर मात करून मंगळवारी (दि. १४) म्हेत्रेवस्ती, चिखली येथील घरी परतलेल्या या आजींचे नागरिकांनी रांगोळी काढून फुले टाकून आणि टाळ्या वाजून जोरदार स्वागत केले.
मुक्ताबाई हिरामण पांचाळ असे या आजीचे नाव आहे. त्यांचा मुलगा माधव पांचाळ यांचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. व्यवसायात नागरिकांची आलेल्या संपर्कातून त्यांना करोनाची लागण झाली. माधव यांच्या संपर्कात आलेल्या त्यांची आई मुक्ताबाई यांनाही करोनाची लागण झाली. त्यांना थंडी, ताप, खोकला येऊ लागला. तसेच श्वास घेण्यासही अडचण येऊ लागली. यामुळे ३० जून रोजी त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर जवळपास १५ दिवस उपचार सुरू होते. मात्र आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी करोनावर मात केली. त्यांना मंगळवारी (दि.१४ जुलै) रोजी घरी सोडण्यात आले.
मुक्ताबाई या करोनावर मात करून आपल्या घरी आल्या. त्यावेळी त्या राहत असलेल्या सिंहगड कॉलनी येथील नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्यावर फुलांची उधळण केली. तसेच कुटुंबियांनी आजींना औक्षण करत त्यांचे जोरदार स्वागत केले.