नऊ वर्षांच्या बालिकेवर साताऱ्यात अत्याचार

सातारा – सातारच्या एका उपनगरात एका नऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी नराधमास तात्काळ अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील एका उपनगरातील नऊ वर्षांची बालिका दि. 25 रोजी (शनिवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी एका नराधमाने तिला उचलून घेत तोंड दाबून त्याच्या घरात नेले. तेथे त्याने बालिकेवर अत्याचार केला. हा प्रकार बालिकेने घरी आल्यानंतर तिच्या आईला सांगितला.
त्यानंतर आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात संशयिताच्या विरोधात तक्रार दिली. संशयितावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन या घटनेची माहिती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.





