पुणे जिल्हा | निमगांव केतकीत मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळा

इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने निमगांव केतकी (ता. इंदापूर) येथील केतकेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये बुधवार (१५ मे) मुस्लिम धर्मिय सहा जणांचा सामुदायिक विवाह सोहळा (इस्तमा-ए -शादी) मोठ्या उत्साहात पार पडला.
इंदापूर चॅरिटेबल ट्रस्ट व संघटना गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा आयोजित करत असून दुष्काळी परिस्थितीत वन्यजीवांसाठी टयांकरने पाणी वाटप, चारा वाटप, रक्तदान शिबिरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अन्नदान व शिर्खुमा वाटप, महापुरुषांच्या जयंती उत्सवात सरबत वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सत्कार व शालेय साहित्य वाटप, त्यांना मार्गदर्शनपर शिबिर घेतले जातात. असे सामाजिक उपक्रम या पुढे ही कायम चालू ठेवणार असल्याचे ट्रस्टचे सचिव मुक्तार मुलाणी यांनी सांगितले.
सामुदायिक विवाह सोहळ्यातील धार्मिक विधीचे शादीचा निकाह अनेक मौलानांच्या उपस्थितीत काझींनी विधीवत पार पाडला. यावेळी नव वधूवरांना कपडे, संसार उपयोगी वस्तू, भांडी, धार्मिक साहित्य वऱ्हाडीमंडळींना सुग्रास जेवण देण्यात आले. यावेळी विवाह सोहळ्यास भलामोठा शामियाना उभारण्यात आला होता.
या सामुदायिक विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नववधू वरांस शुभेच्छा दिल्या. चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी कर्मयोगी व नीराभीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक राजवर्धन पाटील, पृथ्वीराज जाचक, मयूरसिंह पाटील, देवराज जाधव, महारुद्र पाटील, अंकुश जाधव, कमाल जमादार, सिकंदर मुलाणी, दत्तात्रेय चांदणे, संदिप भोंग यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करत सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम ही घेतले. या विवाह सोहळ्यास पुणे, सोलापूर, मुंबई, अहमदनगर, सातारा, सांगली जिल्ह्यातील तब्बल पाच हजारांहून अधिक वऱ्हाडी मंडळींनी उपस्थिती लावली.





