Nimgaon Ketki Accident – निमगाव केतकी-व्याहाळी रस्त्यावर चारचाकी मालवाहू टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. १५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गणेश सतीश बिबे (वय २०, रा. गोतोंडी, ता. इंदापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर ज्ञानदेव अशोक भोंग (वय २८, रा. निमगाव केतकी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निलेश नंदकुमार तांदळकर (रा. निमगाव केतकी) या टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजी शंकर इवरे (रा. गोतोंडी) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, व्याहाळी रोडवरून जात असताना त्यांना त्यांचा चुलत मेहूणा गणेश बिबे व त्याचा मित्र ज्ञानदेव भोंग यांचा अपघात झालेला दिसून आला. घटनास्थळी अशोक लेलँड कंपनीचा एमएच ४२ बीयू १५३३ क्रमांकाचा टेम्पो आढळून आला. गतिरोधकांच्या अभावामुळे अपघात निमगाव केतकी-व्याहाळी-लोणी देवकर या रस्त्यावर निमगाव केतकी ते कवठीचामळा या एक किलोमीटर अंतरात गेल्या दोन वर्षांत चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती; मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे यांनी दिली. करवंदीचामळा,आदलिंगवस्ती, नाव्हमळा रस्ता आणि कौठळी रस्ता या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.