पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या टोळीविरोधात पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ९ आरोपींविरोधात तब्बल 6,455 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबाराचा कट रचण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. कोथरूड परिसरात टोळीची दहशत कमी झाल्याने ती पुन्हा निर्माण करण्यासाठी नीलेश घायवळ याने आपल्या साथीदारांना, “हमराज चौक, शास्त्रीनगर परिसरात जोरात धमाका करा, शस्त्र आणि पैसे मी पुरवतो. केस लागली तरी बाहेर काढतो”, असे सांगितल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. हा कट ६ सप्टेंबर २०२५, गणेश विसर्जनाच्या दिवशी रचण्यात आला होता. या कटानुसार १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभ्या असलेल्या नागरिकांवर घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात मयूर ऊर्फ राकेश कुंबरे, मयंक मॉन्टी व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चांदलेकर, मुसाब शेख, जयेश वाघ, अक्षय गोगावले आणि अजय सरोदे अशा ९ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात ९ जणांना अटक करण्यात आली असून ८ आरोपी फरार आहेत. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे. गुन्ह्यानंतर काही दिवसांतच मुख्य सूत्रधार नीलेश घायवळ परदेशात फरार झाला. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली असून त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून १ पिस्तूल, १ रिकामी पुंगळी, घायवळच्या घरझडतीत २ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी हा गुन्हा टोळीच्या व वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, नीलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांनी कोथरूड परिसरात दोन बेकायदेशीर इमारती बांधल्याचेही तपासात समोर आले असून त्यांच्यावर कारवाईसाठी पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२२ साक्षीदार तपासण्यात आले असून ६ साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीविरोधात मोठा धक्का मानला जात आहे.