पुणे : शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुंडगिरीचा सावळा चेहरा पुन्हा समोर आला आहे. एकीकडे पोलिसांकडून गुंडांना गुडघ्यावर आणून त्यांची ‘वरात’ काढली जात असताना, दुसरीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडनला पळून गेल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. कोथरूडमधील अलीकडील गोळीबार प्रकरणात त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई होणार असताना, घायवळने गुन्हेगारीच्या पैशाने लंडनमध्ये अलिशान घर बांधले आणि मुलाला हायफाय शाळेत दाखल केल्याचा खुलासा झाला आहे. गंभीर गुन्ह्यांच्या रेकॉर्ड असतानाही त्याला पासपोर्ट कसा मिळाला, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. निलेश घायवळ परदेशात पळाला पुणे पोलिसांच्या तपासात असे धागे समोर आले आहेत की, निलेश घायवळने खंडणी, अपहरण, हत्या आणि मारामारीसारख्या गुन्ह्यांमधून कमावलेल्या पैशाने लंडनमध्ये अलिशान निवासस्थान उभे केले आहे. त्याचा मुलगाही तिथे उच्च दर्जाच्या शाळेत शिक्षण घेत असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी स्पष्ट केले की, घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणतीही थेट कारवाई केली नाही, तरी तो परदेशात स्थायिक झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याच्याबाबत लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, भारतात परत येताच अटकेची कारवाई होईल, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. या प्रकरणाने पुण्यातील गुंड टोळ्यांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोथरूड गोळीबार प्रकरण काय? या संपूर्ण प्रकरणाची मुळे कोथरूडमधील १७ सप्टेंबरच्या गोळीबार घटनेत आहेत. मुठेश्वर मित्र मंडळासमोर रात्री ११:४० च्या सुमारास प्रकाश मधुकर धुमाळ (३६, रा. थेरगाव) हे मित्रांसोबत गप्पा मारत उभे असताना, दुचाकीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक वादातून घायवळ टोळीने गोळीबार केला. धुमाळ यांना तीन गोळ्या लागल्या, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर १०-१५ मिनिटांतच टोळीने जुन्या वादाच्या आधारावर वैभव साठे या तरुणाच्या मानेवर कोयत्याने वार केले, ज्यामुळे तोही गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांसाठी कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. आरोपींमध्ये मयूर गुलाब कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख, चंद्रकांत चदिलकर, फाटक, व्यास यांचा समावेश आहे. या १० पैकी ५ जणांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित फरार आहेत.