अकोले – भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असून, धरण 50 टक्के भरले आहे. धरणाचा पाणीसाठा 4 हजार 179 दशलक्ष घनफूट झाला आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 83 टक्के झाला असताना धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण मिळविता यावे म्हणून सोमवारी सकाळपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मंगळवारी संध्याकाळी वाढविण्यात आला.
धरणाच्या सांडव्यातून 5 हजार 252 क्युसेक तर वीजनिर्माण केंद्रातून 835 क्युसेक असा एकूण 6 हजार 87 क्युसेकचा विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडला जात आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी जादा प्रवाह वाढविला जाऊ शकतो. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 83.77 टक्के झाला असून धरणामध्ये 9 हजार 247 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. भंडारदरा धरणामधून पाणी सोडण्यात आल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असुन धरण 50 टक्के भरले आहे. धरणाचा पाणीसाठा 4 हजार 179 दशलक्ष घनफूट झाला आहे. गेल्या 24 तासांत भंडारदरा येथे 63 मिमी पावसाची नोंद झाली. घाटघर येथे 123 मिमी, रतनवाडी येथे 127 मिमी पाऊस पडला. पांजरे येथे 106 मिमी व वाकी येथे 49 मिमी पावसाची नोंद झाली.