मिन्ना (नायजेरिया) : नायजेरियातल्या कॅथोलिक शाळेतून गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलेल्या मुलांपैकी १०० मुलांची सुटका करण्यात आली आहे, असे ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने आज सांगितले. पण अजूनही १०० पेक्षा जास्त मुले दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. नायजेरियातल्या निगेर प्रांतात २१ नोव्हेंबर रोजी हे अपहरण नाट्य घडले होते. सेंट मेरी कॅथोलिक शाळेवर काही सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला करून किमान ३०३ शालेय मुले आणि १२ शिक्षकांचे अपहरण केले होते. मात्र काही तासातच अपहरण केलेल्यांपैकी ५० मुलांनी स्वतःची सुटका करून घेतली होती. गेल्या आठवड्यात आणखी काही मुलांची सुटका झाली असून त्यांना निगेर प्रांताची राजधानी मिन्ना येथे आणण्यात येणार असल्याचे प्रांताचे प्रवक्ते डॅनिएल अटोरी यांनी सांगितले. मात्र या १०० मुलांची सुटका कशी झाली, हे समजू शकलेले नाही. या प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली हे देखील स्पष्ट झालेले नाही. शालेय मुलांच्या अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र खंडणी उकळण्यासाठी स्थानिक सशस्त्र गट अशाप्रकारे शालेय मुलांचे आणि प्रवाशांचे अपहरण करत असतात, असे स्थानिकांनी सांगितले.