पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना पॅरिसमधील न्यायालयाने एका जुन्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. फ्रान्सच्या २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये लीबियातील तत्कामिन अध्यक्ष मोआम्मर गद्दाफी यांच्या सरकारकडून बेकायदेशीर वित्तसहाय्य मिळवण्याच्या प्रकरणी सारकोझी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सारकोझी हे २००७ ते २०१२ पर्यंत फ्रान्सचे अध्यक्ष राहिले होते. त्यांना यापुर्वी चोरीचे सोने स्वीकारणे, सार्वजनिक निधीचा अपहार आणि प्रत्यक्ष न दिसणारा भ्रष्टाचार करण्यासारख्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले होते. मात्र गद्दाफी यांच्या सरकारकडून अध्यक्षीय निवडणुकीसाठी अर्थसहाय्य स्वीकारण्याच्या आरोपावर गेल्या ३ महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. या प्रकरणात दोषी ठरवले गेल्यामुळे सत्ता संपादनासाठी विदेशातून अर्थसहाय्य मिळवण्याबद्दल न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलेले सारकोझी हे फ्रान्सचे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत. त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाने त्यांना ७ वर्षांची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. प्रमुख साक्षीदाराचा मृत्यू सारकोझी यांनी लीबियाचे तत्कालिन अध्यक्ष मोअम्मर गद्दाफी यांच्याकडून अर्थसहाय्य घेतल्याचा आरोप पहिल्यांदा २०११ मध्ये झाला होता. गद्दाफी यांच्याकडून सारकोझी यांना ५० दशलक्ष युरो मिळाल्याचा दावा लीबियातील गुप्तचरांच्या हवाल्याने फ्रान्समधील एका माध्यमाने २०१२ मध्ये केला. अध्यक्षपदाच्या काळात सारकोझी यांच्या निकटवर्तीयांनी केलेल्या विदेशवाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. गद्दाफी यांच्याकडून पैशाने भरलेली बॅग सारकोझी यांच्याकडे पोचवल्याचे लीबिया-फ्रान्सचा नागरिक असलेल्या झेद ताकिद्दीन या उद्योजकाने केला होता. ताकिद्दीन याचा मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लीबिया पुन्हा आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असताना नाटोच्या हल्ल्यानंतरच्या गद्दाफीचे सरकार उलथवले गेले आणि हिंसक आंदोलनादरम्यान गद्दाफी मारला गेला होता.