प्रभात प्रभाव सोरतापवाडी – पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील म्हसोबा फाटा येथे अंडर बायपास रस्त्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. दैनिक प्रभातने सातत्याने या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर आणि नागरिकांच्या आक्रोशाची दखल घेतल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाखालून रस्त्याचे काम सुरू केले आहे.या ठिकाणी मागील काही वर्षांत रस्ता ओलांडताना तब्बल 200 पेक्षा अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही याकडे प्रशासन, महामार्ग प्राधिकरण व शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र, दैनिक प्रभातच्या सलग वृत्तांकनामुळे अखेर प्राधिकरणाने जाग येत काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. म्हसोबा फाट्याजवळील अंडर बायपासची मागणी सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगावमुळ, प्रयागधाम येथील ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. पुणे-सोलापूर महामार्गावरून या गावांना जोडणारा हा मार्ग अत्यंत जवळचा असून, दररोज हजारो नागरिकांचा या भागातून प्रवास होतो. मात्र महामार्ग ओलांडताना जीवाला धोका निर्माण होत असल्याने अपघातांचे प्रमाण मोठे होते. स्थानिक ग्रामपंचायती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देऊन मागणी केली होती. मात्र ती दखल घेतली गेली नाही. दरम्यान, वाकडा पुल परिसर अत्यंत धोकादायक असल्याने याठिकाणी पथदिवे, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक यांचीही आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी दैनिक प्रभातचे आभार मानले असून, या प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिलं नसतं, जर प्रभातने आवाज उठवला नसता, तर आजही आम्ही रस्त्यावर बळी पडत राहिलो असतो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. स्थानीय प्रयत्नांना यश.. या कामासाठी आदर्श सरपंच सुरज चौधरी, सरपंच सुप्रिया चौधरी, माजी सरपंच तानाजी चौधरी, संध्या चौधरी, शोभा चौधरी, पुनम आढाव, माजी उपसरपंच युवराज चौधरी, रवींद्र गायकवाड, सुजित चौधरी, सुभाष कड, अमोल चौधरी, भाऊसाहेब चौधरी, देवेंद्र चौधरी, नवनाथ आढाव, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांच्यासह अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश लाभले आहे. इतर ठिकाणांवरही अंडर बायपासची गरज.. पूर्व हवेली परिसरातही अनेक ठिकाणी अंडर बायपासची आवश्यकता आहे. लोणी काळभोर येथील बोरकर वस्तीजवळील ओढ्यावर अंडर बायपास शक्य आहे. उरुळी कांचन येथून डाळिंब गावाला जाण्यासाठी शेजारील पुलाखालून बायपासचे काम सुरू आहे. अशा उपाययोजनांमुळे वाहतुकीचा ताण कमी होतो, अपघातांना आळा बसतो आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होतो, असे मत सुभाष कड व भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केले.