काबूल- तालिबानने अफगाणिस्तानमध्ये एका संगीतकाराची वाद्ये जाळून टाकली आहेत. अफगाणिस्तानमधील पक्तिया प्रांतात या संगीतकारासमोरच ही वाद्ये जाळून टाकण्यात आली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
वाद्ये पेटवून दिल्यानंतर या संगीतकाराला अश्रू अनावर झाल्याचे या व्हिजीओमध्ये दिसते आहे. या प्रसंगी उपस्थित असलेला एक बंदुकधारी तालिबानी या संगीतकाराकडे बघून छद्मीपणे हसत असल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसते आहे. तर दुसरा व्यक्ती या दुष्टपणाच्या घटनेचा व्हिडीओ बनवत आहे, असे दिसते आहे.
पक्तिया प्रांतातील झझाईअरब जिल्ह्यात तालिबान्यांनी स्थानिक संगीतकाराची वाद्ये जाळून टाकली, असे अब्दुलहक ओमेरी यांनी आपल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी तालिबानने वाहनांमध्ये संगीत वाजवण्यासही बंदी घातली आहे.
कार्यक्रमांच्यावेळी आणि विवाह समारंभांच्यावेळीही संगीत वाजवण्यास तालिबानने बंदी घातली आहे. महिला आणि पुरुषांनी स्वतंत्र सभागृहांमध्ये आनंदोत्सव साजरा करावा असाही फतवा काढण्यात आला आहे.