बारामती (प्रतिनिधी) : कोरोना च्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात भीलवाडा पॅटर्न अवलंबला जात आहे. बारामती शहर व तालुका सीलबंद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम किशोर नवल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद आदींनी बारामती शहराची पाहणी केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्याचा आढावा घेतला. भीलवाडा पॅटर्न यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक देखील केले. जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीत बारामतीत राबविलेल्या ‘भिलवाडा पॅटर्न’ बद्दल त्यांनी माहिती घेतली. विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या . कोरोनचा संसर्ग रोखण्याच्या उपाय योजनेमध्ये शहरातील उपजिल्हा रुग्णालय सिल्वरजुबलीची त्यांनी पाहणी केली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्य तपासणी करणे तसेच कोरोना बाबत लक्षणे आढळल्यास त्यांची त्वरित कोविड 19 चाचणी करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उपाययोजनेमध्ये विलगीकरनासाठी बारामती मेडिकल कॉलेजची देखील पाहणी केली. पोलीस विभागाने 44 झोनमध्ये मध्ये नेमलेल्या वार्ड मार्शला देखील यावेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यावेळी उपस्थित होते.