माहिती भवनसाठी लवकरच जागा देऊ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने कोल्हापूर येथे उभे राहणाऱ्या माहिती भवनसाठी लवकरच जागा उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर पत्रकारांच्या घरांचा प्रश्न, त्यांच्या निवृत्तीवेतनचा प्रश्न आणि पत्रकार भवन याबाबत लवकरच एक संयुक्त बैठक लावून मार्गी लावू, असे आश्वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज झाले. या नंतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. आमदार जयंत पाटील, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, ‘पत्रकारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक आहे. पत्रकारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. वकील आणि पत्रकार यांना सुरूवातीच्या वेळेला विद्यावेतन न मिळाल्यास ते आपापल्या क्षेत्रात टिकून राहत आहेत त्यामुळे पत्रकारांना विद्यावेतन कसे देता येईल याचा विचार सुरू आहे. पत्रकार भवनसाठीही मदत केली जाईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावीने पाच कोटीची तरतूद माहिती भवनसाठी केली आहे. लवकरच माहिती भवनसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल.
आमदार जयंत पाटील यावेळी म्हणाले, ‘ठामपणाने पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची देशाला गरज आहे. देशहिताच्या सर्व सामान्यांच्या बातम्यांना प्राधान्य देणारा पत्रकार जगात नामांकित होऊ शकतो. पहिल्या तीन स्तंभांना धक्का लावण्याचं काम चौथ्या स्तंभात आहे. ज्या दिवशी चौथ्या स्तंभाचे महत्व कमी होईल त्या दिवशी बाकीचे तीन स्तंभ डळमळीत होतील, म्हणून लोकशाहीत चौथ्या स्तंभाला फार महत्व आहे. पत्रकार भवनासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल’, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पत्रकार संघाचे राज्याचे संघटक संजय भोकरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी संपादक अशोक घोरपडे, सुकृत खांडेकर यांच्यासह पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.





