मुंबई – बीसीसीआयचे उपाध्यक्ष महिम वर्मा यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिम हे क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडचे सचिव असून त्यांच्या राजीनाम्यावर लॉकडाऊन संपल्यावर तसेच मंडळाचे कामकाज सुरू झाल्यावर निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या वर्षीच उत्तराखंड क्रिकेट संघटनेला मंडळाने मान्यता दिली होती. त्यानंतर लगेचच महिम यांना मंडळात उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. महिम यांची मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उत्तराखंड संघटनेचे सचिवपद रिक्त होते. त्यामुळे पुन्हा घेण्यात आलेल्या निवडणूकीत महिम हेच पुन्हा निवडून आले. लोढा समितीच्या आचारसंहितेनुसार एका व्यक्तीला एकाच पदावर काम करावे लागत असल्याने महिम यांनी मंडळाचे उपाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला.