विम्बल्डन टेनिस स्पर्धा : गॉफ व जोकोविच यांचे अपराजित्व कायम

विम्बल्डन – अमेरिकेची उदयोन्मुख खेळाडू कोको गॉफ व सर्बियाचा गतविजेता खेळाडू नोवाक जोकोविच यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत अपराजित्व कायम राखले. गॉफ हिने स्लोवेनियाच्या पोलोना हर्कोग हिच्याविरूद्ध 3-6, 7-6 (9-7), 7-5 असा सनसनाटी विजय मिळविला.

उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीमधील दुसऱ्या सेटमध्ये ती 2-5 अशी पिछाडीवर होती. त्यावेळी पोलोना हिच्याकडे सामना जिंकण्याच्या दोन संधी उपलब्ध होत्या. मात्र गॉफ हिने जिगरबाज खेळाचा प्रत्यय घडवित हे दोन्ही मॅचपॉंईन्ट वाचविले व 5-5 अशी बरोबरी केली. तेथून तिने सर्व्हिसब्रेक मिळवित सलग दोन्ही गेम्स घेत सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी केली. तिने टायब्रेकरद्वारा हा सेट मिळवित सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा तिने सर्व्हिसब्रेक मिळविला. हा सेट घेत तिने विजयश्री खेचून आणली.

पुढच्या फेरीत तिची सिमोना हॅलेप हिच्याशी गाठ पडणार आहे. हॅलेप हिने जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित व्हिक्‍टोरिया अझारेन्का हिचा 6-3, 6-1 असा पराभव केला. पहिल्या सेटमधील 1-3 अशा पिछाडीवरून तिने सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवीत सामन्यावर पकड घेत विजय खेचून आणला.

जोकोविच याने पोलंडच्या ह्युबर्ट हुर्काझ याचा 7-5, 6-7 (5-7), 6-1, 6-4 असा पराभव केला. त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने वेगवान सर्व्हिस केल्या. पहिल्या दोन सेटमध्ये ह्युबर्टने चिवट झुंज दिली. मात्र, नंतर त्याला परतीचे फटके व सर्व्हिस यावर नियंत्रण ठेवता आले नाही. जोकोविच याला पुढच्या फेरीत फ्रान्सच्या उगो ह्युम्बर्ट याच्याशी खेळावे लागणार आहे.

गतवर्षी उपविजेतेपद मिळविणाऱ्या केविन अँडरसन याला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. अर्जेन्टिनाच्या गुईदो पेला याने चौथ्या मानांकित अँडरसन याच्यावर 6-4, 6-3, 7-6 (7-4) असा विजय मिळविला. त्याने फोरहॅंडच्या खणखणीत फटक्‍यांचा उपयोग केला. पेला याच्यापुढे मिलोस राओनिक याचे आव्हान असणार आहे.

महिलांच्या विभागात युक्रेनच्या डायना येस्त्रेमस्का हिने स्वित्झर्लंडच्या व्हिक्‍टोरिया गोलुबिक हिचा 7-5, 6-3 असा पराभव केला. तिने पासिंग शॉट्‌सचा बहारदार खेळ केला. कॅरोलिना मुचकोवा हिने विजयी घोडदौड राखली. तिने 20 व्या मानांकित ऍनेटी कोन्तावेट हिचा 7-6 (9-7), 6-3 असा पराभव करीत खळबळजनक विजयाची नोंद केली. पेत्रा क्विटोवा हिने विजयी वाटचाल कायम राखली. तिने पोलंडच्या मॅगदा लिनेटी हिचे आव्हान 6-3, 6-2 असे सहज संपुष्टात आणले. तिने फोरहॅंडच्या खणखणीत फटक्‍यांचा उपयोग केला.

Leave A Reply

Your email address will not be published.