पुणे : दुचाकी वाहने चोरणाऱ्या जेजुरीतील एकास समर्थ पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ४० हजारांच्या चार चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. दिपक भिवाजी आहेर (वय २९, रा. धालेवाडी फाटा, जेजुरी, ता. पुरंदर मूळ रा. निर्मल पिंपरी, ता. राहता ज़ि अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा यासाठी समर्थ पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी (दि. ११ मार्च) नाना पेठेतील कादरभाई चौकात संशयित वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी ए.डी.कॅम्प चौकातून कादरभाई चौकाकडे येणारा एक दुचाकीस्वार तरूणाने समोर पोलीस वाहनांची तपासणी सुरू करीत आहेत हे पाहिले आणि तो गोंधळला तसेच दुचाकी वळवून तेथून पळून जात असताना पथकातील कर्मचाºयाने पाहिले आणि त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता दिपक आहरे याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. तसेच तो वापरत असलेल्या अॅक्टिवा दुचाकीचे कागदपत्रेही त्याच्याकडे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसानी त्याला पोलीस ठाण्यात घेवून गेले. तेथे केलेल्या तपासात त्याने सदर मोपेड दुचाकी एक वर्षापूर्वी पदमजी पार्क भागातून चोरी केली असल्याची माहिती दिली.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गतवर्षी वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, कर्मचारी राजस शेख, निलेश साबळे, सुशिल लोणकर, संतोष काळे,प्रमोद टिळेकर, अनिल शिंदे, स्वप्निल वाघोले, सचिन पवार, साहिल शेख , गणेश कोळी, सुमित खुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.