उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आले समोरासमोर; ‘त्या’ कृतीने राजकीय वर्तुळात चर्चा…

मुंबई – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा अकरावा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला.
दरम्यान, अर्थसंकल्पानंतर महायुती सरकारच्या या बजेटपेक्षा राज्याच्या विधानभवन परिसरात झालेल्या एका भेटीची सर्वाधिक चर्चा होत आहे. तीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणाला हादरा देणारी घटना घडली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेना पक्षात उभी फूट पडली. याच फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेमधून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या फुटीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर आले. मात्र या दरम्यान दोघांमध्ये कोणतीही चर्चा, नमस्कार तर नाहीच पण दोघांनी एकमेकांकडे साधे पाहिलेही नाही.
समरोसमोर आल्यावर काय घडलं ?
अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निघाले असतानाच समोरुन उद्धव ठाकरे, अंबादास दानवे आणि मिलींद नार्वेकर आले. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला, यावेळी दोघांमध्ये धावता संवादही झाला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरेंच्या समोर येणे टाळले. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांना बगल देत निघून गेले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही. या भेटीवरुनच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुन्हा दिलजमाई होणे अशक्य आहे, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.





