रायगड – पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर आरक्षणावर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यावर ते काहीच बोलले नाही. मणिपूर पेटतंय, आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उरत आहे, आत्महत्या करत आहेत. पण ज्वलंत प्रश्नावर बोलायचे नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आताचे समीकरण, हे “मी’करणकडे चालले आहे. सगळे काही मीच. माझ्याशिवाय कुणीच नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. रायगडमध्ये आज महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शिर्डीत शरद पवारांचा नामोल्लेख टाळत कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला होता. यावेळी व्यासपीठावर अजित पवार उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे यावेळच्या दौऱ्यात मोदींनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करण्याचे टाळले होते. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची फिरकी घेतली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, काल पंतप्रधान मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसले होते. ते म्हणाले की शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना शेतीसाठी काही केले नाही. परंतु, शरद पवार जेव्हा कृषीमंत्री होते तेव्हाच पहिल्यांदा देशात 70 हजार कोटीची कर्जमाफी ही पवार कृषीमंत्री असताना दिली होती. पण किती सुडाचे राजकारण कराल. परंतु एक दिवस महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड निघाला की या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना जागेवर आणता येईल, असा इशाराही त्यांनी दिला.