…तर हा सेल्फी अखेरचा ठरला असता; ट्रॅव्हल बस अपघातातील प्रवाशाने सांगितली आपबीती

पुणे – कोल्हापूरहून डोंबिवलीला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसला साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात बस तीन-चार वेळा उलटली. त्यानंतर ट्रकही उलटला. यात बसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू, तर 22 जण जखमी झाले. हा भीषण अपघात बंगळुरू-मुंबई महामार्गावर स्वामी नारायण मंदिरासमोर भूमकर पूल, नऱ्हे येथे मध्यरात्री घडला. पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी पुढील दुर्घटना टळली. शिवाय, जखमींना तातडीने उपचार मिळाले.
अरुण सावंत (50), रवींद्र वासुदेव कोरगावकर(45, रा.राधानगरी, कोल्हापूर), निशा प्रमोद भाटकर(36, रा.शास्त्रीनगर, कोल्हापूर) आणि सुवर्णा वासुदेव कोरगाकर (83, रा. राधानगरी, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.
तर, संजू सोनू गवळी (37, रा. अंबरनाथ), निता रामचंद्र जहागीरदार (52, रा. ज्ञानेश्वरनगरी, कोल्हापूर), नितीन भगवान जाधव (52,रा.भिवंडी), मधुकर रामचंद्र जाधव (65,रा.सांगली), निखील मधुकर जाधव (31,रा.सांगली), ट्रक चालक सनी यादव, रश्मी राजेश चिरकली (37,रा.डोंबिवली), संगीता नितीन जाधव (44, रा.भिवंडी), पल्लवी संजु गवळी (32,रा.अंबरनाथ), गणेश रवींद्र मग्गी (35,रा.डोंबिवली), सुशांत सुहास पवार (28,रा. मोवरे, कराड), पूजा राजू कांबळे (31,रा.टिटवाळा), राजू विश्वास कांबळे (40,रा. टिटवाळा), माधवी अरुण सावंत (48,रा. कल्याण), जयश्री अशोक देसाई (72, रा.कोल्हापूर), साहेबराव कडुबा वाघमोडे (25,रा. बुलढाणा), अधिर प्रमोद भास्कर (6), वैभव अनिल वनारसे (16, रा. बदलापूर), हरिदास मुकूंद मांढरे (47, रा.वाई), ओंकार वैभव वनारसे (17,रा.बदलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
खाजगी बस क्र एम.एच. 03 – सीपी 4409 ही नीता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती. मालवाहतूक करणारा मोठा ट्रक एमएच 12 सीआर 1224 यामध्ये साखरेची पोती होती. तो अजिंक्यतारा कारखान्यातून साखर घेऊन मुंबईच्या दिशेने चालला होता. जखमींना ससून रुग्णालय, दीनानाथ रुग्णालय, नवले रुग्णालय , चव्हाण रुग्णालय आणि काही जवळपासच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न-
या बसमध्ये 26 ते 27 प्रवासी होते. तर ट्रकमध्ये चालक, मालक आणि मालकाचा मुलगा असे तिघे होते. साखरझोपेत असतानाच अपघात झाल्याने प्रवाशांना थोडावेळ काहीच सुचले नाही. मात्र, बस उलटल्यानंतर आत धूर झाल्याने प्रवाशांचा जीव कासावीस झाला. त्यांनी बचावासाठी जीवाच्या आकांताने ओरडण्यास सुरवात केली. अपघाताचा आवाज आणि प्रवाशांचे किंकाळ्या ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसची मागची आपत्कालिन खिडकी फोडली यातून प्रवाशांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.
तोवर अग्निशमन दल आणि पोलिसांना वर्दी देण्यात आली होती. त्यात पुणे मनपा आणि पीएमआरडीए यांची अग्निशमन आणि रेस्क्यु व्हॅन अशी 7 वाहने दाखल झाली. घटनेचे गांभीर्य पाहून दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवान वरील बाजूस जाऊन दोरखंडाचा वापर करत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. तसेच पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे पंधरा वर्षांची मुलगी अडकली असता जवानांनी त्यांना प्रयत्नपूर्वक जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यांना शासनाच्या 108 या रुग्णवाहिकेतून जवळपासच्या रुग्णालयांत दाखल केले.
…तर तो सेल्फी अखेरचा ठरला असता : सुशांत पवार
अपघातातील जखमी सुशांत पवार (28) हे कल्याण येथे खासगी कंपनीत नोकरी करतात. ते रात्री सव्वादहा वाजता कराडहून बसमध्ये बसले. त्यांनी तेथे सेल्फी घेत घरच्यांना पाठवला. बस रात्री सव्वाबारा वाजता उंब्रजला हॉटेलसमोर थांबली. ती तेथून निघाल्यावर सुशांत यांना झोप लागली. मात्र, रात्री सव्वादोनच्या सुमारास बसला मागून कोणीतरी जोरात धडकल्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. काही कळायच्या आतच बस तीन-चार वेळा उलटली. गाडीमध्ये अचानक धूर आल्याने त्यांनी बचावासाठी आरडा ओरडा केला.
आजूबाजूने जाणारे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सुशांतने त्याच्या शेजारी असणाऱ्या जखमी लहान मुलीला प्रथम खिडकीतून नागरिकांकडे सोपवले. यानंतर ते नागरिकांच्या मदतीने बाहेर आले. सुशांत म्हणाले, “माझ्या पाठीला मार लागला आहे. बस आणि ट्रकची अवस्था मी डोळ्यांनी बघितली. तसेच गंभीर जखमीनांही बघितले. त्यांना अगोदर रुग्णवाहिकेतून उपचाराला जाऊ दिले. ही परिस्थिती पाहता मला आता असे वाटते की बसमध्ये काढलेला तो सल्फी कदाचित माझा अखेरचा ठरला असता. मात्र, सुदैवाने तसे काही झाले नाही.’

