Temple Gold : भारत सरकारने मंदिरांमधील सोन्याच्या मुद्रीकरणाच्या अफवा फेटाळून लावल्या असून, असे कोणतेही प्रस्ताव नसल्याचे म्हटले आहे. देशभरातील मंदिरे आणि धार्मिक संस्थांकडील सोन्याचे मुद्रीकरण करण्याची योजना असल्याच्या अफवांचे भारत सरकारने खंडन केले आहे. सोशल मीडियावरील अटकळी पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणार्या आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. शिवाय, सरकार मंदिरांना त्यांच्या सुवर्णसाठ्याच्या बदल्यात ’गोल्ड बॉण्ड्स’ जारी करणार असल्याच्या ऑनलाइनवर पसरलेल्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण आले आहे. काही पोस्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, मंदिरांच्या बांधकामात, ज्यात गोपुरे, दरवाजे आणि सजावटीच्या पाट्या यांचा समावेश आहे, वापरलेले सोने भारताच्या स्ट्रॅटेजिक गोल्ड रिझर्व्हचा (सामरिक सुवर्ण साठा) भाग म्हणून गणले जाईल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने नागरिकांना पडताळणी न झालेल्या माहितीवर विश्वास ठेवणे किंवा ती प्रसारित करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. चुकीच्या माहितीमुळे जनतेमध्ये अनावश्यक घबराट आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात असेही नमूद केले आहे की, एक खोटा वृत्तांत अनावश्यक गोंधळ निर्माण करू शकतो आणि जनतेची दिशाभूल करू शकतो.