नेवासा: “ज्यांनी चाळीस वर्षे शेतकऱ्यांना लुटले, त्यांनीच आता आमचा साखर कारखाना अडचणीत आणण्यासाठी नवी कुभांडे रचण्यास सुरुवात केली आहे,” असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री तथा स्वामी समर्थ साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक विजय शिवतारे यांनी केला आहे. वजन काट्याच्या बहाण्याने कारखान्यात विनापरवाना प्रवेश करून गोंधळ घालणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर बदनामीचे खटले दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला. वरखेड (ता. नेवासा) येथील स्वामी समर्थ कारखान्याने चालू हंगामात दोन लाख टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव मिळत असल्याने विरोधकांकडून षडयंत्र रचले जात असल्याचे शिवतारे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “कारखाना सुरू होऊ नये म्हणून यापूर्वी सातवेळा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. आता वजन काट्याचा खोटा मुद्दा उपस्थित करून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा वजन-मापे निरीक्षकांनी तपासणी केली असता सर्व काटे योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.” ज्यांचा कारखान्याशी काडीचाही संबंध नाही, अशा व्यक्तींनी कायद्याचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. ही केवळ ‘नौटंकी’ असून उसाच्या गव्हणीत लोखंडी अँगल टाकून कारखाना बंद पाडण्याचे नीच कृत्यही करण्यात आले. नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचा या कारखान्यावर विश्वास असून, अशा विघ्नसंतोषी लोकांमुळे आपल्या विश्वासार्हतेला बाधा येणार नाही, असेही शिवतारे म्हणाले.