Supriya Sule Car Accident: खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धडक
Supriya Sule Car Accident : दरम्यान, सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा पुढील महिन्यात उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत विवाह होणार असून, त्यानिमित्त विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यासाठी सुळे सध्या दौरे करत आहेत.

Supriya Sule Car Accident: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया (Supriya Sule) यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी रात्री अपघात झाला.
गुजरात क्रमांकाच्या एका वाहनाने त्यांच्या कारला बाजूने धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती स्वतः खासदार सुळे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे या शनिवारी कामानिमित्त सातारा दौरा आटोपून पुण्यामार्गे मुंबईकडे येत होत्या. रात्री साडेआठच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास सुरू असताना GJ13CF5257 या क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या कारला बाजूने जोरदार धडक दिली. संबंधित चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अथवा निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe.
Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on… pic.twitter.com/WrOGsNzqLX
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2026
अपघातानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत सांगितले की, “आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना महामार्गावर एका वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवत माझ्या वाहनाला धडक दिली. हा अत्यंत वाईट अनुभव होता. मात्र सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत.”
यावेळी त्यांनी महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त केली. “अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालविने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, सतर्क राहावे आणि जबाबदारीने वाहन चालवावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा पुढील महिन्यात उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत विवाह होणार असून, त्यानिमित्त विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यासाठी सुळे सध्या दौरे करत आहेत.





