सध्याची लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी : खा. शिवाजीराव आढळराव पाटील

वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटाचा केला दौरा

वाघोली – देशभरात निवडणुकीचे वारे वाहात आहेत. चौथ्यांदा मी लोकसभा निवडणूक लढवीत आहे. पण माझ्या दृष्टीने ही निवडणूक खऱ्या अर्थाने देशातील जनतेसाठी महत्त्वाची आहे. पुढची 5 वर्षे देशाच्या नेतृत्वाची धुरा कुणाच्या खांद्यावर असणार आहे, पुढच्या 5 वर्षांत देशाचे भवितव्य काय असणार आहे, जगाच्या बाजारात भारताची किंमत काय असणार आहे हे सगळे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळेच या निवडणुकीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. देशाचे नेतृत्त्व कुणी करायचे हे ठरविणारी ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

आपल्या निवडणूक प्रचारार्थ खासदार आढळराव पाटील यांनी शनिवारी (दि. 6) वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटाचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, जिल्हाप्रमुख राम गावडे, भाजपा अध्यक्ष संदीप भोंडवे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, महिला आघाडी जिल्हा संघटिका श्रद्धा कदम, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, पोपट शेलार, भाजप तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, बापुसाहेब शिंदे, सुरेश सातव, दादासाहेब सातव, विपुल शितोळे, विशाल सातव, युवराज दळवी, राजेंद्र तांबे, प्रकाश शिवले, माऊली शिवले यांसह शिवसेना-भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार आढळराव म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानपदाचा विचार करायचा झाला तर आपल्यापुढे दोनच पर्याय आहेत, त्यापैकी एक पर्याय म्हणजे नरेंद्रजी मोदी. आज अमेरिका, युरोप, आशिया खंडात कुठेही जा, भारताची सन्मानाची ओळख नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षांपासूनच्या केलेल्या कारभारामुळे झाली. त्यामुळे नरेंद्र मोदी हा एक पर्याय. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी. मुळात राहुल गांधी या देशाचे नेतृत्व करण्यासाठी पर्याय होऊ शकतो का? असा सवाल खासदार आढळराव पाटील यांनी केला. दरम्यान, वाघोली गावातील पाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रश्‍न सोडविण्यासाठी या भागाचा खासदार म्हणून विशेष लक्ष घातले. त्यामुळेच वाघोलीच्या 25 कोटींच्या सुधारित पाणी योजनेसह जिल्हा परिषद गटात सुमारे 38 कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे आपण केली असल्याची माहिती खासदार आढळराव पाटील यांनी दिली.

आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले की, मतदारसंघात फिरणारा, लोकांना 24 तास उपलब्ध असणारा खासदार आढळराव यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. केंद्रसरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आढळराव यांनी आपल्या खासदारकीच्या काळात हजारो कोटींची विकासकामे केली आहेत. काम करताना त्यांनी कधी कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा कार्यकर्ता काम घेऊन आला आहे हे कधीच पाहिले नाही. त्यांनी आलेल्या व्यक्‍तीची समस्या कशी सोडवता येईल एवढेच पाहिले. प्रत्यक्ष काम करणे आणि काम केल्याचा अभिनय करणे या दोन्हीत फरक आहे. त्यामुळे जनतेची काम करायची असतील, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आढळराव पाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधीच खासदार म्हणून हवा, त्यासाठी 29 एप्रिल रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करा, असे आवाहन आमदार पाचर्णे यांनी यावेळी केले.

15 वर्षात प्रतिमेवर छोटासा डागही नाही

आजच्या तारखेला भारताच्या कानाकोपऱ्यातून लहान-थोरांपासून सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला आहे की देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या हाती द्यायचे. आजच्या तरुणांना स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचार रोखणारे नेतृत्व हवे आहे. अभिमानाने सांगू शकतो की, गेली 15 वर्षे मी खासदार आहे, पण या 15 वर्षांत मी हजारो कोटींची विकासकामे केली, पण ते करताना एक छोटासा डागही माझ्या प्रतिमेवर लागू दिला नाही. कारण राजकारणात मी मुळात आलो ते जनतेची सेवा करायला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे अश्रू पुसायचे होते, या भागाचा विकास करायचा होता, त्यासाठीच मी राजकारणात आलो. विकासकामांचा विचार केला तर काही पूर्ण झाली आहेत तर काही मंजूर झाली आहेत. त्यात मी कुठेही कमी पडलेलो नाही, असे खासदार आढळराव यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.