अमरावती – महात्मा गांधी यांच्या संबंधात अवमानकारक विधाने केल्याच्या कारणावरून अमरावती पोलिसांनी हिंदुत्ववादी विचारांचे नेते संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॉंग्रेसने विधानसभेत हा विषय लाऊन धरला होता व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी भिडे यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 153 अ (धर्म, वंश, जन्म स्थान, निवास स्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक भिडे यांनी गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले भिडे यांनी अमरावतीतील बडनेरा रोड परिसरातील भारत मंगल हॉलमध्ये एका सभेला संबोधित केले, त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कॉंग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी भिडे यांच्याविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
शुक्रवारी महाराष्ट्र कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भिडे यांचे वक्तव्य लाजिरवाणे असल्याचे सांगत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती.