Maharashtra Politics: महायुतीत कुरबुरींना जोर! आणखी एक मित्र पक्ष नाराज, बाहेर पडण्याचा दिला इशारा

मुंबई – राज्यातील सत्ताधारी महायुतीत कुरबुरींना जोर आला असून आणखी एक मित्र पक्ष नाराज असल्याचे चित्र दिसू लागले आहे. महायुतीमध्ये सामील झालेले आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. यापाठोपाठ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही स्वबळाचा नारा देत महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे नाराज होते. परभणीतून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षासोबत त्यांची बोलणीही झाली असल्याचे सांगितले जाते. मात्र महायुतीने त्यांची समजूत काढत त्यांना परभणीतून उमेदवारी दिली. मात्र, उमेदवारी मिळाली खरी मात्र जानकरांना या मतदारसंघातून विजय मिळवता आला नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महादेव जानकरांनी नाराजीचे अस्त्र पुन्हा एकदा उपसले आहे.
महादेव जानकरांनी आपली नाराजी बोलून दाखवताना म्हटले की, रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे. आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हेच माहिती नसल्याने प्रत्येकाने आपली तयारी केली पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरण घडले असून यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याचेही नाव पुढे आले आहे. या प्रकरणाबाबत जानकर म्हणाले, त्याच्यावर एफआयआर झाला असून प्रत्येकाकडून चूक होत असते, मात्र त्याचा पॉलिटिकल इव्हेंट करणे योग्य नाही. याचा अर्थ असा होत नाही की मी बावनकुळे यांची बाजू घेतो, उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याही घरात काही घटना घडली, तर त्यावेळी सुद्धा माझी हीच भूमिका असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.




