युवराजकडून हिटमॅनचे कौतुक नवी दिल्ली – भारतीय संघात स्थान पक्के करण्यात खूप उशीर करणाऱ्या रोहित शर्माकडे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची गुणवत्ता आहे, अशा शब्दात माजी क्रिकेटपटू युवराजसिंग याने रोहितचे कौतुक केले आहे. रोहितची फलंदाजी पाहिल्यावर मी प्रभावीत झालो होतो. तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील त्याच्यातील गुणवत्ता ओळखली होती. हा मुलगा एक दिवस भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर घेऊन जाईल, असे त्यावेळी धोनी म्हणाला होता, अशी आठवणही युवराजने सांगितली. कर्णधार विराट कोहलीनंतर सध्याच्या क्रिकेटमधील तीनही प्रकारात रोहित सातत्याने धावा करत आहे. एकवेळ त्याच्यावर मर्यादित षटकांचा फलंदाज अशी टीका होत होती. मात्र, त्याने गेल्यावर्षी भारतीय कसोटी संघात मिळालेल्या संधीचे सोने केले. दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंडचा दौरा सोडून मायदेशी परतावे लागले अन्यथा सामन्यांचे निकाल बदलून टाकले असते. त्याच्याकडे कोहलीप्रमाणेच जागतिक क्रिकेटवर वर्चस्व राखण्याची गुणवत्ता आहे, असेही युवराजने सांगितले. रोहितने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा पाकिस्तानच्या इंझमाम उल हक याचीच मला आठवण आली. पाकिस्तान संघात दादा फलंदाज होते. मात्र, इंझमामने त्यांच्या क्रिकेटचा चेहराच बदलून टाकला. हेच काम रोहितने देखील केले.