पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांना आपल्या घरात कशाची कमतरता नाहीना हे पाहण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाहीये. ही बाब लक्षात घेऊन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पोलिसांच्या वसाहतीत विनामुल्य अत्यावश्यक वस्तू पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजीनगर मुख्यालयात पोलिसांचे लष्कराच्या धर्तीवर स्वतःचे कॅन्टीन आहे. येथे सवलतीत त्यांना घरगुती वस्तु मिळतात.
लॉकडाऊनच्या काळात पोलीस रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांना वेळेत घरी जाताही येत नाही. त्यामुळे कुटुंबियांसाठी लागणाऱ्या दररोजच्या वस्तूही त्यांना नेता येत नाहीत. मात्र व्यंकटेशम यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी रोजच्या साठी लागणाऱ्या वस्तूंची घरपोच सेवा सुरु केल्यामुळे रोज रेशन, कांदा, बटाटा, सॅनिटायझर यासारख्या विनामूल्य वस्तू पोलिसांच्या कुटुंबियांना घरपोच दिल्या जाणार आहेत.
दरम्यान, सह पोलीस आयुक्त डॉ. शिसवे व अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांनी स्वारगेट व सोमवार पेठेतील पोलीस वसाहतीत जाऊन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे. संसर्ग रोखण्यासाठी काय उपायोजना केल्या पाहिजेत या बाबत मार्गदर्शन केले. सर्व पोलीस वसाहतीतील नागरिकांना देखील सूचना देण्यात आल्या असून कोरोना बाबतच्या जनजागृतीचे पोस्टर लावण्यात आले आहेत.