पुणे – रुग्णालयात सर्व प्रकारची दक्षता घेऊन काम केले जाते. त्याच धर्तीवर सगळी खबरदारीची उपाययोजना करून मार्केट यार्ड चालविले जाईल, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले. भुसार बाजार सुरू झाला असून, लवकरच फळ, भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये, म्हणून भीतींनी दि पुना मर्चंट्स चेंबर, आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी बंद पुकारला. मात्र, नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यानुसार भुसार बाजार सुरू झाला आहे. आडते असोसिएशन आणि कामगार संघटना त्यांच्या सभासदांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. लवकरच बाजार सुरू होईल, असे देशमुख यांनी सांगितले.
ते म्हणाले, एक दिवस भाजीपाला, एक दिवस कांदा-बटाटा, एक दिवस फळांचा बाजार सुरू ठेवण्यात येईल. ज्यामुळे गर्दी कमी होईल. व्यापार सुरळीत होईल. मोशी, खडकी उपबाजार सुरू झाला आहे. मांजरी आणि मुख्य बाजार लवकरच सुरू होईल. पुणे शहरात नागरिकांना आवश्यक असलेला अन्नधान्य, भाजीपाल्याचा दैनंदिन पुरवठा करणार आहोत. शहराला चार-पाच दिवस पुरेल एवढा भाजी पुरवठा आहे. घाबरून जावू नका, गर्दी करू नका, बाजार समिती प्रशासन आणि बाजार समिती घटक लोकांच्या सेवेत लवकरच येत आहोत.
भाजीपाला, अन्नधान्य पुरवठा करण्यास बांधील आहोत. अफवांवर विश्वास ठेवू नका, साठेबाजी करू नका, असे आवाहन त्यांनी केली. मर्यादीत खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांना, कामगार आणि इतर बाजार संघकांना लवकरच ओळखपत्र, त्यांच्या गाड्यांना स्टीकर देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी यावेळी नमुद केले.