कर्नाटकच्या राजकीय पेचात आता ज्योतिषांचा बोलबाला

बंगळुरू – कर्नाटकातील राजकीय नाट्यात राज्यपाल, केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय यांच्यासह आता ज्योतिषांचीही एन्ट्री झाली आहे. सुमारे 15 दिवसांपासून कर्नाटकमधील राजकीय पेच कायम आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणताही तोडगा दृष्टिपथात आलेला नाही. जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार अडचणीत असून हे सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तर सरकार पाडण्यासाठी भाजपचेही प्रयत्न सुरू आहेत. या नाट्यात सरकार वाचवण्यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेण्यासह अनेक नेते होमहवन करत आहेत. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होऊ लागले आहे.

विधानसभेत बहुमताचा प्रस्ताव मंगळवारपर्यंत पुढे ढकलल्यास कुमारस्वामी यांच्या सरकारला धोका नसल्याचा दावा काही जेडीएस नेत्यांनी ज्योतिषांच्या हवाल्याने केला आहे. विधानसभेत बहुमतावरील चर्चा मंगळवारपर्यंत सुरू ठेवावी असा सल्ला ज्योतिषांनी दिल्याचे जेडीएस नेते सांगत आहेत. त्याचप्रमाणे जेडीएसचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा, कुमारस्वामी, त्यांचे भाऊ एच. डी. रेवण्णा आणि देवेगौडा परिवार सरकार वाचवण्यासाठी विशेष पूजा करत असल्याचे जेडीएसच्या एका नेत्याने सांगितले. देवेगौडा परिवार बुधवारी बंगळुरुतील शृंगेरी शारदा पीठात गेले होते. दुष्ट शक्‍ती दूर राहाव्यात आणि सरकार वाचावे यासाठी काही दिवसांपासून एच.जी, रेवण्णा अनवाणी चालत आहेत. विधानसभेतही रेवन्ना गुरुवारी अनवाणी आले होते. सरकार वाचवण्यासाठी जेडीएस काळीजादू करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. रेवण्णा शुक्रवारी विधानसभेत लिंबू घेऊन फिरत होते. यामागे काळी जादू असल्याचे भाजपने म्हटले आहे.

मात्र, भाजपच्या सर्व नेत्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. प्रतिकूल परिस्थितीत रेवण्णा स्वतःजवळ लिंबू ठेवतात. त्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळतो. त्यात काळी जादू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपचा हिंदू संस्कृतीवर विश्वास आहे. मात्र, आमचे नेते पूजापाठ करत आहेत तर भाजप आमच्यावर काळी जादू करत असल्याचा आरोप करत आहे, असा पलटवार कुमारस्वामी यांनी केला आहे.

तसेच लिंबू आणि काळ्या जादूने सरकार वाचवता येते काय असा सवालही त्यांनी केला आहे. जेडीएस नेत्यांप्रमाणे भाजपचे नेतही पूजा,पाठ व होम हवन करत आहेत. येडियुरप्पा यांचे सरकार स्थापन व्हावे यासाठी भाजप नेत्यांचेही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दोन दिवसात कर्नाटक विधानसभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. भाजपाच्या सदस्यांना सभागृहात झोपावे लागले. आता या घडामोडींवर पुढच्या आठवड्यात काहीतरी निकाल लागण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर हे प्रकार बंद होण्यास मदत मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.