Petrol-Diesel : अवघ्या 5 दिवसांत पेट्रोल, डिझेल दीड रूपयाने ‘महाग’

नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत लिटरमागे अनुक्रमे 30 आणि 36 पैशांची वाढ केली. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत दोन्ही इंधने दीड रूपयाने महागली.
दरवाढीच्या सत्रामुळे मुंबईत पेट्रोल 95 रूपयांच्या घरात पोहचले आहे. तर दिल्लीत त्या इंधनाचा दर 88 रूपये 44 पैसे इतका झाला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 78 रूपये 74 पैशांवर, तर मुंबईत 85 रूपये 70 पैशांवर गेला आहे. सलग दरवाढीमुळे चालू आठवड्यात पेट्रोल 1 रूपया 51 पैशांनी, तर डिझेल 1 रूपया 56 पैशांनी महागले.
मागील वर्षीच्या मार्चपासून पेट्रोलचा दर सुुमारे 19 रूपयांनी, तर डिझेलचा दर 16 रूपये 45 पैशांनी वाढला आहे. इंधनांच्या बेसुमार दरवाढीमुळे विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. जनसामान्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी इंधनांवरील करांत कपात करण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, सरकारने तूर्त इंधनांवरील कर कमी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.





