पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सभा तहकुबींवर भर

लोकप्रतिनिधींची महापालिकेकडे पाठ : कर्मचारी प्रशिक्षणासाठी

पिंपरी – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लोकप्रतिनिधींनी महापालिकेत फिरकणेच बंद केले आहे. केवळ नावापुरतेच विविध सभांचे कामकाज सुरु ठेवले जात आहे. तर बहुतांशी सर्वच समित्यांच्या साप्ताहिक, पाक्षिक व मासिक सभा तहकूब करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सभा कामकाजाचे काम थंडावल्याचे चित्र आहे.

महापालिकेची मार्च महिन्याची सर्वसाधारण सभा पार पडण्यापुर्वीच आचारसंहिता लागू झाल्याने यंदाच्या अंदाजपत्रकाला या सभेची मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या प्रशासकीय अधिकारांचा वापर करून, यंदाच्या अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीचे काम सुरू केले आहे. 20 मार्चची नियोजित मासिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. याशिवाय महापालिकेची तिजोरी असलेली स्थायी समितीची 27 मार्चची साप्ताहिक सभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली. ही तहकूब सभा आणि नियोजित साप्ताहिक सभा येत्या 3 एप्रिलला आयोजित केली आहे.

महिला व बालकल्याण विभागाची 22 मार्चला होणारी सभा 12 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. विधी समितीची 15 मार्चला होणारी सभा 5 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शहर सुधारणा समितीच्या दोन सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची आचारसंहितेमधील 22 मार्चची सभा 12 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आचारसंहितेमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने, या सभांच्या विषयपत्रिकांमध्ये देखील किरकोळ स्वरुपाचे विषय येत आहेत.

आचारसंहितेमुळे बहुतांश नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरवली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेकडून सुमारे चार हजार कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे.

कार्यालयीन कामकाजावर परिणाम

महापालिकेच्या बहुतांशी सर्वच विभागांमधील कर्मचाऱ्यांना “इलेक्‍शन ड्युटी’ लावण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेक विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. तरीदेखील उपलब्ध मनुष्यबळावर महापालिकेचे काम विनाअडथळा सुरू असल्याचा दावा प्रशासन विभागाने केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.