शाहरूख खानच्या ‘पठाण’ची रेकाॅर्डब्रेक कमाई; 2 दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

नवी दिल्ली – प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेच्या केंद्र स्थानी राहिलेल्या शाहरूख खान यांच्या पठाण सिनेमाची बॉक्स ऑफसवरील घोडदौड आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. या चित्रपटाचे जगभरातील दुसऱ्या दिवसाचे एकूण कलेक्शन तब्बल दोनशे कोटी रूपयांपर्यंत पोहचले आहे.
दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 219 कोटी 60 लाख रूपये इतके झाले आहे. यशराज फिल्म्सच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जगभरात 113 कोटी 60 लाखांचा गल्ला गोळा केला.
या चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे देशांतर्गत एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 70.5 कोटी रूपये इतके होते. पठाण हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलगु भाषेतही प्रदर्शित झाला आहे. हिंदी सिनेमाने एकाच दिवशी देशात 70 कोटींचा धंदा करणे हा आजवरचा विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकाच दिवसाचे कलेक्शन 30 कोटी 70 लाख रूपये इतके होते.
शाहरूख खान यांचा चार वर्षानंतर प्रदर्शित झालेला हा पहिलाच चित्रपट आहे. या आधी सन 2018 साली त्यांचा झिरो हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यशराज फिल्म संस्थेमध्ये या चित्रपटाच्या यशाने आनंदाचे वातावरण आहे. त्याबद्दल त्यांनी प्रसार माध्यमे, प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीचे आभार मानले आहेत.





